'फडणवीस बेईमानी करणार नाहीत'; संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी सोमवारी रात्री १२.३० पासून सलाईन आणि उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
आज पुन्हा सरकारमधील मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ अंतरवाली गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
संभाजी भिडे म्हणाले की, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 100 टक्के यश येणार. मी राजकारणी नाही, शब्द फिरवणं मला येत नाही. या लढ्याचा शेवट आरक्षण मिळाल्यावर झाला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. ही लढाई एक घाव दोन तुकडे अशी नाही. जरांगेंनी आता उपोषण थांबवावे असे भिडे म्हणाले.
जरांगेंनी पुढची जबाबदारी माझ्यावर सोपवावी. उपोषण थांबवूया, पुढच्या कामाला लागूया. अजित पवार काळीज असलेला माणूस आहे. जरांगेंचे हे उपोषण अभिमानास्पद आहे. असे संभाजी भिडे म्हणाले.