संभाजी भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; वादग्रस्त वक्तव्यानंतर महिला आयोगाची नोटीस
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महिला पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असला, ‘तुझ्या कपाळाला टिकली नाही, त्यामुळे मी प्रतिक्रिया देणार नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. यामध्ये महिला पत्रकारांचाही समावेश होता. या भेटीबद्दल महिला पत्रकाराने विचारले असता, संभाजी भिडे यांनी या महिला पत्रकाराकडे पाहिले आणि तुझ्या कपाळाला टिकली नाही म्हणून प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगितले. एवढेच नाही तर आपली भारतमाता विधवा नाही. प्रत्येक स्त्री ही भारतमातेसमान असते, तू कुंकू लाव. मग मी तुझ्याशी बोलेन, असे विधान देखिल त्यांनी केले. या वक्तव्यानंतर आता संभाजी भिडेंना महिला आयोगाची नोटीस बजावण्यात आली आहे.
यासोबतच मी मुख्यमंत्र्यांबरोबर देश व धर्मासंबंधी बोललो. दोघांतील चर्चा पत्रकारांना कशाला सांगू, असे देखिल ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.