Sandeep Deshpande : 'पवारांबरोबर जाताना सगळ्यांना विचारलं होत का?', संदीप देशपांडे यांचा युतीबाबत उद्धव ठाकरेंना टोला
राज्यभर हिंदी भाषेच्या सक्तीवरून ठिकठिकाणी वेगवेगळे पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यातच आता मनसे पक्ष अधिक आक्रमक झाली असून त्याचे पडसाद राज्यात पाहायला मिळाले. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेऊन राज्य सरकारच्या नव्या निर्णयावर टीका करत मनसेने हिंदी पुस्तके फाडून होळी करत निषेध नोंदवला होता. आज याच संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदी भाषेच्या सक्तीवर आपल्या पक्षाची भूमिका मांडली.
ज्या पद्धतीने आडमार्गाने हिंदीची सक्ती केली जात आहे, त्याला मनसेचा पूर्ण विरोध आहे. भाषा जगली तर आपण जगू, त्यामुळे हिंदी भाषेला विरोध हा करणारच. येत्या आठवड्याभरात सह्यांची मोहीम, निदर्शने जनजागृती, शाळांबाहेर पालकांची मिटींग घेणे असे कार्यक्रम मनसेतर्फे राबवले जाणार आहेत. याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला उमटताना दिसणार आहेत. हिंदी भाषेची इतकी सक्ती का केली जात आहे, याचे नेमके कारण काय, हे शोधणारच. यासाठी रस्त्यावर उतरून टोकाचा विरोधही करायला मनसे मागे पुढे पाहणार नाही, असे यावेळी संदीप देशपांडे म्हणाले.
यावेळी संदीप देशपांडे यांना मुख्याध्यापकांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, शिक्षक हे काही सरकारचे गुलाम नाहीत. एखादी चुकीची गोष्ट घडत असेल तर ती बदलण्याची जबाबदारीसुद्धा शिक्षकांची आहे. शाळेतील शिक्षकांवर दबाव टाकून नाही तर त्यांना सोबत घेऊन हा लढा करायचा आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन दबाव निर्माण करण्याचे काम आपण या आंदोलनाद्वारे करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
ठाकरे-मनसे युतीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, २०१७ मध्येसुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला युतीचा प्रस्ताव देण्यात आला होता. तेव्हा त्यांचे शिवसैनिक सकारात्मक झाले नाहीत?, याआधीही पोस्टर लावले गेले होते. मात्र तेव्हा यांचे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता नव्हती. आता वेळ खराब आहे, म्हणून ही सकारात्मकता दाखवली जात आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. पवारांबरोबर जाताना ठाकरेंनी मिटिंग घेऊन सगळ्यांना विचारलं होत का ?, असा ही टोला मनसे कार्यकर्ते संदीप देशपांडे यावेळी लगावला.