सर्व काही भोगलेले किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा...; संजय राऊतांचं टीकास्र
राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना, दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना(ठाकरे गटाला) मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर लगेचच हा प्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किर्तीकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हक्कालपट्टी करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी गजानन कीर्तीकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ” तुम्ही गेलात, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण हा पक्षाला कोणताही धक्का नाही. १८ पैकी १३ तिकडे गेले असले, तरी काय झालं? त्यांना पुन्हा निवडूनही यायचं आहे ना? त्यांच्यापैकी किती निवडून येतात बघून घेऊ ना”,
तसेच “किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रीमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून दोनदा त्यांना खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्षासोबत आहेत.पण सर्व काही भोगलेले किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठीक आहे गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील” असे म्हणत राऊतांनी किर्तीकरांवर हल्लाबोल केला आहे.