Sharad Pawar: घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांचा ठाम विश्वास
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनेक नेत्यांनी भाषण केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला आपल्या भाषणातून शरद पवार यांनी चांगलंच सुनावलं आहे.
काय म्हणाले शरद पवार?
जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणार नाही असा टोला शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केला. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले.
भोपाळच्या सभेमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हटलं, पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कशी शपथ दिली असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केली. विरोधकांना एकत्रित करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पंतप्रधान अस्वस्थ झाल्याचंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझं काही मत नाही, पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
“ठिक आहे, तुम्ही सांगू शकता. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कुणाला दिली? ही सगळ्या देशाला माहिती आहे. तुमच्यासाठी सांगतो, कोण कुठे जाणार नाही”, असं आश्वासन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं.
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा आज मेळावा पार पडला. या मेळाव्यात पहाटेचा शपथविधी शरद पवार साहेबांच्याच आशीर्वादाने घेतला होता, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना आज अजित पवारांनी संपूर्ण इतिहासच सांगितला आहे. राष्ट्रवादीने तब्बल तीन वेळा भाजपसोबत जायचं ठरवलं होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.