आशिया कप 2025 : भारताच्या नव्या जर्सीवरून पडदा उघडला, 23 वर्षांनी मोठा बदल
थोडक्यात
टी-20 आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची नवी जर्सी अखेरसमोर
भारतीय खेळाडू शिवम दुबेने फोटोशूटदरम्यान नवी जर्सी परिधान केली
भारताचा समावेश ‘A’ गटात झाला आहे,
Asia Cup 2025 : टी-20 आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची नवी जर्सी अखेर चाहत्यांसमोर आली आहे. स्पर्धेला काही दिवस बाकी असताना भारतीय खेळाडू शिवम दुबेने फोटोशूटदरम्यान नवी जर्सी परिधान केलेल्या काही छायाचित्रांची सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
हीच ती जर्सी आहे जी भारतीय संघाने मागील वर्षीच्या टी-20 विश्वचषकात वापरली होती. मात्र, यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे जर्सीवर कोणत्याही प्रायोजकाचा लोगो नाही. केवळ बीसीसीआयचा चिन्ह, आशिया कपचा अधिकृत लोगो आणि भारताचं नाव यावर दिसत आहे. त्यामुळे तब्बल 23 वर्षांनंतर भारतीय संघ कोणत्याही प्रायोजकांशिवाय मोठ्या स्पर्धेत उतरतो आहे. यापूर्वी 2002 मध्ये असे घडले होते.
ड्रीम-11 सोबतचा करार संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने नवा प्रायोजक शोधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी 16 सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. तसेच, कोणताही नवा प्रायोजक ऑनलाइन गेमिंग, बेटिंग किंवा जुगाराशी संबंधित नसावा, अशी अट घालण्यात आली आहे.
दरम्यान, आशिया कप 2025 चे यजमानपद भारताकडे असले तरी राजकीय तणावामुळे ही स्पर्धा UAE मध्ये आयोजित केली जात आहे. भारताचा समावेश ‘A’ गटात झाला आहे, ज्यात पाकिस्तान, UAE आणि ओमान हे संघही आहेत. भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी UAE विरुद्ध खेळणार आहे.
भारतीय संघाची घोषणा
कर्णधार सूर्यकुमार यादव, उपकर्णधार शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग.