Nashik Trimbakeshwar Temple : श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांसाठी गर्भगृह दर्शन राहणार बंद, तर VIP दर्शनावरही निर्बंध
श्रावण महिन्यात महादेवाच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होत असे. अशातच सर्व भाविकांना नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावणामध्ये व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे. तर प्रत्येक श्रावणी सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्रावणात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद राहील. आलेल्या प्रत्येक भाविकाला त्र्यंबकेश्वराचं दर्शन व्हावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राजगिरा लाडूचा प्रसाद मिळणार आहे. श्रावण महिन्यात अतिमहत्वाच्या व्यक्ती वगळता VIP दर्शन बंद राहणार आहे. तसेच सामान्य रांगेत पाच तास तर पेड दर्शनाच्या रांगेत अडीच तास दर्शनासाठी वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.