चोरीसाठी वापरण्यात आलेल्या बाईकमुळे पकडले गेले दोन चैनस्नॅचर
अमजद खान | कल्याण : काही दिवसापूर्वी कल्याणमध्ये एका महिलेचे दागिने चोरी करून चोर फरार झाले मात्र त्यांना माहित नव्हते कि ते दोघे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिस सीसीटीव्हीच्या सहाय्याने या चोरटय़ांचा शोध घेत आहे. दोघे एका बाईकवर फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघानां पकडले. आदेश बनसोडे आणि अमित पाल अशी या चोरटय़ांची नावे आहेत. यांच्याकडून चोरीस गेलेल्या तीन बाईक, पाच मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. पुढील तपास सुरु आहे.
काही दिवसापूर्वी कल्याण पूर्व भागातील विजयनगर परिसरात एका महिलेचे चैन आणि दागिने हिसकावून दोन चोरटे बाईकवरुन पसार झाले. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हरीदास बोचरे आणि दीनकर केदारे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांकडून जवळपास 47 सीसीटीव्ही चेक करण्यात आले. काही सीसीटीव्हीत दोन संशयित तरुण एका बाईकवर फिरताना दिसून आले. महिलेकडून आणि काही नागरीकांकडून चोरटय़ांची हीच बाईक होती असे सांगितले गेले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. खब:यांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली की, त्याच बाईकवर कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरात फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून त्या दोन चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्या.