Chhatrapati Sambhajinagar :  'त्या' दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पालिकेकडून मदत जाहीर; तर ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार

Chhatrapati Sambhajinagar : 'त्या' दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पालिकेकडून मदत जाहीर; तर ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार

सिद्धार्थ उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा भाग कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर शहराला बुधवारी (11 जून रोजी) सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्याने हादरवून टाकले. सायंकाळी 6.45 ते 7.30 या वेळेत सरासरी 80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. यावेळी सिद्धार्थ उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा भाग कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

दुर्घटनेत दोघींचा जागीच मृत्यू

या दुर्दैवी घटनेत स्वाती अमोल खैरनार (37, रा. शिवनेरी कॉलनी) आणि रेखा हरिभाऊ गायकवाड (65, रा. गजानननगर, हडको) यांचा जागीच मृत्यू झाला. शेख अकील रहीम हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस आणि मनपा अधिकारी तात्काळ पोहोचले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दुर्घटनास्थळी भेट देत संपूर्ण तपासाचे आदेश दिले.

ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार

सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराकडे होती. घटनेतील हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी जाहीर केले. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे.

वादळी वाऱ्याचे 45 मिनिटांचे तांडव

दुपारपर्यंत शांत असलेले वातावरण सायंकाळी 6 वाजेनंतर अचानक बदलले. अवघ्या काही मिनिटांत आकाशात काळसर ढग दाटले आणि वाऱ्याचा वेग झपाट्याने वाढला. 80 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरातील होर्डिंग्ज, पत्रे, दुकाने, हातगाड्या, तसेच रस्त्यावरचे स्टॉल्स उडून गेले. शहरातील नागरिकांनी जीव मुठीत धरून सुरक्षितता शोधली.

सात दिवस बंद राहणार सिद्धार्थ उद्यान

दुर्घटनाग्रस्त सिद्धार्थ उद्यान सात दिवसांकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्समधील अर्धवट कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संपूर्ण पाहणी करण्यात येणार आहे. विशेष समितीमार्फत ही चौकशी होईल. याशिवाय शहरातील इतर बीओटी प्रकल्पांचीही सुरक्षा तपासणी करण्यात येईल.

निकृष्ट दर्जाचे बांधकाम ठरले जीव घेणे

दुर्घटनेचा मुख्य कारणभूत घटक म्हणजे निकृष्ट दर्जाचे बांधकाम व प्रवेशद्वाराची असम्यक देखभाल. सिमेंट-विटांच्या गेटखाली दबून दोन निष्पाप जीव गेल्यामुळे शहरात संताप व्यक्त होत आहे. ठेकेदारावरील कारवाईसह संपूर्ण तपास करून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Chhatrapati Sambhajinagar :  'त्या' दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पालिकेकडून मदत जाहीर; तर ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार
Nana Patole : महायुती सरकार बरखास्त करण्याची नाना पटोलेंची राष्ट्रपतींकडे मागणी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com