उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या नेत्यांकडे व्यक्त केली 'ही' अपेक्षा
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री येथे सायन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनाही ‘जय महाराष्ट्र’ म्हणत खोचक टोला लगावला आहे.
पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनाही इशारा
“मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे की, ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या. माझ्या एक गोष्ट लक्षात येतेय की, कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येतंय, मग ते उधाण रागाचं आहे… त्वेषाचं आहेय… जिद्दीचं आहे… आपली जिंकण्याची ईर्ष्याही आणखी वाढत आहे. पक्षातून जे गेलेत त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’ आहे. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत.
शिंदे गटाला इशारा
आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.
कोणत्याही परिस्थितीत आपले बालेकिल्ले राखायला तुम्ही सगळे समर्थ आहात. आता आपल्यात जे भक्तीचं उधाण येतंय, ते पाहून आता त्यांनाच धक्के बसतील. एवढं होऊनही शिवसेना का संपत नाहीये? उद्धव ठाकरे का संपत नाही? असा त्यांना प्रश्न पडेल. प्रत्येक वेळी टीका करताना त्यांना उद्धव ठाकरेंवरच बोलावं लागतं. कारण त्यांना तुमची धास्ती आहे. त्यामुळे एक-एक सहकारी फोडण्यापेक्षा एकदाच निवडणुका घेऊन दाखवा.