‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा’, उदयनराजे भोसले

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने पदावरुन दूर करा’, उदयनराजे भोसले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलच तापले आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. राजकीय वर्तुळातून या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.

उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा, अशी मागणी उदयनराजे यांनी केलीय. उदयनराजे यांनी पत्रात लिहिले की, “काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्देवी आहे. याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे”. “२० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे. आणि दुसरे वक्तव्य हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो”

यासोबतच “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केलाच आहे. पण यापूर्वीही त्यांनी समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केले होते. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे”महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत”, तसेच “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने राज्यपाल पदावरुन दूर करावे, अशी आमची मागणी आहे. आपण यावर योग्य ती कारवाई कराल याची खात्री आहे”, असे उदयनराजे यांनी पत्रात लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com