अमृतसागर दूध संघाच्या अध्यक्षपदी वैभव पिचड तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार वैभव पिचड यांची तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडणुकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मंडळाला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर शेतकरी विकास मंडळाने 13 जागांवर विजय मिळवला. पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाने एकतर्फी विजय संपादन केला.
अमृतसागर दूध संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडी करिता नुकतेच निवडणूक पार पडली. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पराय यांनी काम पाहिले. त्यामध्ये अध्यक्ष पदी वैभवराव पिचड व उपाध्यक्ष पदासाठी रावसाहेब वाकचौरे यांचे एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड पार पडली. अध्यक्ष पदासाठी पिचड यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक आनंदराव वाकचौरे यांनी मांडली त्यास अरुण गायकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी वाकचौरे यांचे नाव रामदास आंबरे यांनी सूचविले त्यास आप्पासाहेब आवारी यांनी अनुमोदन दिले. निवडीनंतर भाजपच्या वतीने अमृतसागर दूध संघ कार्यालय परिसरात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष वैभवराव पिचड म्हणाले की, दूध उत्पादकांनी शेतकरी विकास मंडळावर मोठा विश्वास दर्शविला.अनेक अडचणींवर मात करीत दूध संघावर कर्जाचा बोजा न करता दूध संघ नफ्यात आणला. यापुढील काळात दूध संघाचे नाव राज्यभर होईल त्यासाठी प्रयत्न करू असे पिचड म्हणाले.