मुंबईकडे येणाऱ्या विमानाला पक्षी धडकला; उत्तर प्रदेशमध्ये इमर्जन्सी लँडींग
उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या विमानाला पक्षी धडकल्याच्या वृत्तानं खळबळ उडाली आहे. वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर विस्ताराच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं आहे. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानातील बिघाड शोधण्यासाठी विमानतळावरील यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असून, दुरुस्तीचं काम सुरु आहे.
विस्तारा एअरलाइन्सचं UK 622 विमानाने शुक्रवारी संध्याकाळी 4:10 वाजता उड्डाण घेतलं. उड्डाण घेताच विमानाच्या समोरच्या भागाला आदळला. विमानाच्या पायलटने तात्काळ वाराणसी ए.टी.सी. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि काही वेळाने विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. विमानात सुमारे 101 प्रवासी होते.
विमानतळावरून उड्डाण करताच वैमानिकाला विमानाला पक्षी आदळल्याचा संशय आला. त्यामुळे वैमानिकाने तात्काळ एटीसी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विमानाला पक्षी धडकल्याची माहिती दिली. विमानाचे पुढच्या काही मिनिटांत म्हणजे 4:40 वाजता इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ATC कडून परवानगी मिळाल्यानंतर विमान विमानतळावर सुखरुप लँड झाल्यानंतर विमानातील सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पक्ष्यांच्या धडकेमुळे निर्माण झालेला बिघाड दूर करण्याचा एअरलाइन्स तज्ज्ञांचं पथक काम करत आहे.