Pune Crime : धक्कादायक! मुलगी जन्मल्याचा राग; सासरच्यांनी महिलेला ठेवलं 15 दिवस उपाशी, संधी मिळताच महिलेनं गाठलं माहेर
मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेला तब्बल 15 दिवस उपाशीपोटी डांबून ठेवण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील या घटनेनं पुन्हा एकदा पुरोगामी महाराष्ट्रातील वास्तव समोर आलं आहे. उपाशीपोटी 15 दिवस छळ सहन करणाऱ्या त्या महिलेनं अखेर संधी मिळताच आपल्या बाळाला घेऊन सासरच्या घरातून पळ काढला. ती महिला बीड येथे तिच्या माहेरी आली. बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत या महिलेनं तक्रार दाखल केली असून याप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला शिवानी चंदनशिवेचा विवाह पुण्यातील पिंपळा सौदागर येथील आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या निहाल चंदनशिवे याच्यासोबत मोठ्या धूमधडाक्यात झाला होता. लग्नाची काही वर्ष चांगली गेली. यादरम्यान शिवानी गर्भवती राहिली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी जन्मला का घातली म्हणून पतीसह सासू - सासरा आणि दीराने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. एके दिवशी घरी कोणीही नसल्याचं पाहून कडी-कोयंडा तोडून शिवानीने पुण्यातून पळ काढला. ती थेट आपल्या माहेरी बीडला आली. आई वडिलांच्या सोबतीने तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह आणि दिरावर गुन्हा दाखल केला आहे.