भद्रा मारुती! निद्रिस्त अवस्थेतेतील मारुतीची मूर्ती असणारं एकमेव ठिकाण
सिल्लोड प्रतिनिधी|अनिल साबळे : भक्तांना पावणार निद्रिस्त अवस्थेतील महाराष्ट्र राज्यातील एकुलता एक मारुती म्हणजे खुलताबाद येथील भद्रा मारुती. खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान या तीर्थक्षेत्रासाठी देखील विशेष परिचित आहे. भद्रा मारूती या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे.
खुलताबादेत दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा भरते. या दिवशी खुलताबादेत हजारो लोक औरंगाबाद व आसपासच्या गावातून पायी चालत येतात. "शयनमुद्रेतील ही मारुतीची मूर्ती पाहण्यासारखी आहे. त्यामुळे महाबली बलभीम भक्तांनी इथे आवर्जून भेट द्यायलाच हवी. इथला मारुती नवसाला पावतो अशी पंचक्रोशी मध्ये ख्याती आहे." असं मिठू पाटील बारगळ हे सांगतात.
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.
भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाची चांगली सोय संस्थांच्या वतीने ठेवली जाते. या भाविकांना फराळ, जेवणाची व्यवस्था करण्यात येते. तसेच आरोग्य सुविधा देखील पुरविल्या जातात. दूरच्या भाविकांच्या मुक्कामाच्या सोयीसाठी भक्त निवासही उभारण्यात आले आहे. एकंदरीत भद्रा मारुती संस्थानला दर्शनासाठी येणारा भाविक प्रसन्नपणे मनोभावे मारुतीची पूजाअर्चा करून मार्गस्थ होतो.