Shreyas Iyer: दमदार कमबॅक! न्यूझीलंड मालिकेपूर्वी अय्यरची तुफानी बॅटिंग; न धावता केल्या ५८ धावा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत झालेल्या जबर दुखापतीमुळे तीन महिने मैदानापासून दूर राहिलेल्या श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमाल कमबॅक केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड झाली असली तरी नावापुढे स्टार मार्क लावण्यात आला होता. मालिकेपर्यंत फिटनेस सिद्ध करावी लागेल, अशी सूचना बीसीसीआयने दिली होती. आता श्रेयसने हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सहाव्या फेरीच्या सामन्यात ८२ धावांची धमाकेदार खेळी करून आपली फिटनेस आणि फॉर्म दोन्ही सिद्ध केली आहे.
हिमाचल प्रदेशविरुद्ध १० चौकार, ३ षटकारांसह ८२ धावा
हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबई संघाने दोन विकेट स्वस्तात गमावल्या होत्या. यशस्वी जयस्वाल १५ आणि सरफराज खान २० धावांवर बाद झाले होते. संघावर दडपण वाढले असताना श्रेयस अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी मुशीर खानसोबत भागीदारी करत संघाला सावरण्यात मोलाची भूमिका बजावली.
सुरुवातीला सावध खेळी करत १८ चेंडूत फक्त ८ धावा केल्या. नंतर खेळपट्टीवर नजर बसली आणि मयंक डागर, कुशल पाल, अभिषेक कुमार या गोलंदाजांवर भारी पडला. ५३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावा केल्या, ज्यात ५८ धावा न धावताच मारल्या. १५४.७२ च्या स्ट्राईक रेटने खेळत २० चेंडू निर्धाव राहिला तरी प्रत्येक चौथ्या चेंडूत चौकार ठोका.
टीम इंडियातील पुनर्वापसीची टेस्ट पास
हा सामना श्रेयससाठी केवळ विजय हजारेचा सामनाच नव्हता, तर टीम इंडियातील पुनर्वापसीची खरी टेस्ट होती. दुखापतीतून सावरलेल्या श्रेयसने ही तपासणी यशस्वीरीत्या पास केली. त्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने ३३ षटकांत ९ विकेट गमावून २९९ धावा केल्या आणि हिमाचलला ३०० धावांचे विजयाचे आव्हान दिले. या परफॉर्मन्समुळे श्रेयस आता न्यूझीलंड मालिकेसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सिग्नल मिळाले आहेत. उपकर्णधारपदीही तो चमकण्यास तयार आहे.
दुखापतीनंतर श्रेयस अय्यरचे विजय हजारे ट्रॉफीत दमदार पुनरागमन.
हिमाचल प्रदेशविरुद्ध १० चौकार, ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी.
न धावता ५८ धावा; स्ट्राईक रेट १५४.७२.
न्यूझीलंड मालिकेसाठी फिटनेस आणि फॉर्म दोन्ही सिद्ध.
