(Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत जगाचे लक्ष वेधले आहे. भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफपासून ते रशिया-युक्रेन युद्ध आणि भारत-पाकिस्तान तणावापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.
टॅरिफचा वाद चिघळत असतानाच ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत गंभीर इशारा दिला आहे. “प्रतिबंध लावून काहीही साध्य होत नाही. पुढच्या दोन आठवड्यांत मी यावर मोठा निर्णय घेणार आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांनी चर्चेच्या टेबलावर बसणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, रशियाने युक्रेनमधील एका अमेरिकन कारखान्यावर हल्ला केल्याचा उल्लेख करत ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मी सात युद्धे थांबवली आहेत आणि तीन युद्धे टाळली आहेत. पुढचे पाऊल खूप मोठे असणार आहे,” असे ते म्हणाले.
याचवेळी त्यांनी भारत-पाकिस्तान तणावाबाबत जुना दावा पुन्हा पुढे केला. “भारत आणि पाकिस्तानमध्ये परमाणू युद्ध होणार होते, पण मी ते थांबवले,” असा ट्रम्प यांचा दावा. मात्र, भारताकडून वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे की, दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय चर्चेमुळे तो संघर्ष टळला गेला होता. दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी सांगितले की, पुतिन हे झेलेन्स्की यांच्याशी थेट भेटायला तयार आहेत. आता युक्रेनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु, जर ही भेट झाली नाही, तर ट्रम्प यांच्या ‘मोठ्या निर्णयामुळे’ जागतिक घडामोडींमध्ये नवे वळण येण्याची शक्यता आहे.