थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच कडाक्याची थंडी पडत असून, उत्तरेकडील शीतलहरीच्या प्रभावाने गारठा वाढला आहे. उत्तरेकडून येणारी शीतलहरी कमी झाल्याने थंडीची लाट गायब झाली असली तरी गारठा कायम आहे. पुढील काही दिवसांत तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याचवेळी वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, हवेची गुणवत्ता खालावल्याने सर्दी, ताप आणि गळ्यात खवखव यासारख्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. डॉक्टरांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा इशारा दिला आहे.
धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तिथे ५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाड येथे ६.५ अंश, परभणी येथे ७.२ अंश, तर जेऊर येथे ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर, भंडारा, पुणे, मालेगाव, यवतमाळ येथे १० अंशांपर्यंत तापमान खाली आले आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून, नागरिकांना गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मुंबईसह पुण्यातही हवा खराब झाली आहे, ज्यामुळे श्वसनाचे विकार वाढले आहेत.
पुण्यातील हवेची गुणवत्ता सतत खालावतेय. गेल्या काही आठवड्यांपासून एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम ते खराब श्रेणीत असूनही, महापालिकेकडून ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (जीआरएपी) केवळ कागदावर मर्यादित आहे. ब्रँडेड उपाययोजना राबवल्या नसल्याने पर्यावरण तज्ञ आणि नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे प्रदूषण नियंत्रणात अपयश आले आहे.
कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
दुसरीकडे, देशातील काही भागांत थंडी असताना काही ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतरही काही राज्यांत पाऊस कायम आहे. भारतीय हवामान विभागाने १७ ते २० डिसेंबरदरम्यान उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, लडाख, पुद्दुचेरी येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील नागरिकांनी थंडी आणि प्रदूषणापासून सावधगिरी बाळगावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
१७ ते २० डिसेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा IMD अलर्ट
उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू, कर्नाटकसह अनेक राज्यांना इशारा
राज्यात थंडी कायम, काही भागात तापमान ५.५ अंशांपर्यंत घसरले
वाढत्या वायू प्रदूषणामुळे आरोग्याचा धोका, सावधगिरीचा सल्ला