आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने नुकताच आपल्या साखरपुड्याची बातमी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अचानक पूजाचे तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याची बातमी दिली होती. एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल खास गोष्ट सांगितली आहे. पूजा म्हणाली, 'आपण आपला भूतकाळ सिद्धेशसोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. एक पार्टनर म्हणून आयुष्यात पुढे जाताना त्याला आपल्याबद्दल सगळं सांगणं गरजेचं आहे का?' याबद्दलदेखील पूजा सावंतने सांगितलं आहे.
एका मुलाखतीमध्ये पूजा सावंत म्हणाली, 'भूतकाळ शेअर करण्याआधी एकमेकांवर विश्वास असावा. जर तुमचा विश्वास घट्ट आणि मजबूत असेल तरच तुमचा भूतकाळ आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत शेअर करावा. आपण आपला भूतकाळ मागे ठेवून नवीन आयुष्य सुरू करत असतो. तेव्हा तुम्हाला माहीत नसतं की कधी, केव्हा आणि कसं तुमचा भूतकाळ तुमच्यासमोर येईल. माझ्याही घरी असं होतं की, 'जे आहे ते आधी बोलून घे, मग निर्णय घ्या'. पण सिद्धेशला माझा भूतकाळ जाणून घेण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. सिद्धेश म्हणाला, 'मला तू हवी आहेस, याच्यापुढचं आयुष्य मला तुझ्यासोबत घालवायचं आहे. मला तुझ्या भूतकाळात काहीही इंटरेस्ट नाहीये. मला काहीही ऐकायचं नाही तू मला सांगूही नकोस'. पुढे पूजा म्हणाली, 'मी सिद्धेशला बऱ्याचदा सांगण्याचा प्रयत्न केला'. पण सिद्धेश म्हणाला, 'मला माहीत आहे हे सगळं कसं हाताळायचं'.
पूजाचा होणारा नवरा ऑस्ट्रेलियातील एका कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आलं आहे. लवकरच पूजा सावंत सिद्धेशसोबत लग्न करणार आहे.