भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अंत्यविधी आज संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले. सर्वसमावेशक राजकारणी म्हणून पुण्याच्या राजकारणात जनमानसात ओळख आहे. त्यांना सर्वच स्तरावरुन श्रध्दांजली वाहण्यात येत आहे. मराठी अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.
रुचिता जाधवने गिरीश बापट यांच्याबरोबरचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व सोबतच गिरीश बापट यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे. भाऊ… तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले… आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही… वडिलांसारखी तुमची माया आणि शाब्बासकीची थाप मला कोण देणार… तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही… भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ, असे रुचिताने म्हंटले आहे.
गिरीश बापट सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले होते. मागील दीड वर्षांपासून गिरीश बापट आजाराशी लढा देत होते. उपचार सुरु असतानाही कसबा पोटनिवणुकीसाठी भाजपच्या मेळाव्यात पोहचले होते.