मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत तिळगुळ देण्याघेण्याच्या निमित्तानी आपल्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम योजण्याची पद्धत असते. पूर्वीच्या काळी घरात आलेल्या प्रत्येक स्त्रीला, अगदी लहान मुलीला सुद्धा ती निघण्यापूर्वी हळदी कुंकू लावण्याची प्रथा होती. पुरुष सुद्धा पूजा अर्चा करण्यापूर्वी कपाळावर कुंकू लावत असत. प्रत्येक भारतीय प्रथेमागे काही ना काही शास्त्र असतंच, ते यामागेही आहे.
हळद-कुंकू असं जरी आपण म्हणत असलो, तरी मुळात कुंकू हे हळदीपासून बनवलेलं असतं. शुद्ध हळदीला चून्याच्या पाण्याची भावना दिली की त्यातून कुंकू तयार होतं. स्त्रियांच्या बाबतीत कुंकू भ्रुमध्याच्या थोडं वर आणि हळद त्याखाली म्हणजे दोन भुवयांच्या मधे लावली जाते. शरीर शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समजतं की नेमक्या याच ठिकाणी आत मेंदूमध्ये पिट्यूटरी आणि पाइनल ग्रंथी असतात.
संपूर्ण हार्मोनल प्रणाली जिच्या अधिपत्याखाली चालते ती पाइनल ग्रंथी आणि अध्यात्म विद्या तृतीय नेत्राची कल्पना जिच्या ठिकाणी करते, स्पष्टीकरण, अंतर्ज्ञान यासारख्या गोष्टी जिच्यामुळे जाणवतात ती पाइनल ग्रंथी. या दोन्हीं ग्रंथींना उत्तेजन मिळावं, त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळावी यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये भ्रुमध्यात हळद कुंकू लावलं जातं.
स्त्रियांच्या बाबतीत कुंकू लावण्यामागे अजून एक कारण असतं की कुंकू लावल्यामुळे स्त्री अधिक सतर्क राहते. एखादी व्यक्ती जर तिच्याकडे चुकीच्या नजरेनी पाहत असेल तर तिला ते लगेच समजतं आणि त्यामुळे वेळेवर ती स्वतःचं रक्षण करू शकते. दक्षिण भारतात कुंकवाच्या बरोबरीनी चंदनाचं गंध लावलं जातं. उष्णता बाधू नये यासाठी चंदनाच्या शीतलतेची युक्तीपूर्वक केलेली ती एक योजना असते. हिमालयात संपूर्ण कपाळावर भस्म लावलं जातं कारण त्या ठिकाणच्या रेडिएशन पासून आणि अति थंडीपासून रक्षण करण्याचं ते एक साधन असतं.
वैष्णवांचं गंध वेगळं, शैवांचं गंध वेगळं असं जरी असलं तरी त्या मागचा हेतू पिट्यूटरी, पाइनल ग्रंथीना प्रेरणा देणं, त्यायोगे शरीरातील अग्नी, हार्मोन्स, मन, बुद्धी यासारख्या सूक्ष्म तत्त्वांवर काम करणं हाच असतो.
पण हा हेतू पूर्ण होण्यासाठी हळद असो, कुंकू असो का चंदन असो, या गोष्टी शुद्ध आणि नैसर्गिक असणं गरजेचं होय. कोणतीही लाल रंगाची पावडर कुंकू म्हणून वापरली तर त्याचा उपयोग होणं तर दूरच, उलट त्यातील कृत्रिम द्रव्यामुळे त्वचेवर पुरळ येऊ शकतात. बाजारात मिळणाऱ्या अष्टगंधात सुगंधासाठी मिसळलेले रासायनिक द्रव्य अपायकारक ठरणारं असतं. त्यामुळे मंडळी कपाळावर गंध किंवा कुंकु लावताना ते शंभर टक्के शुद्ध आणि नैसर्गिक असल्याची खात्री करून घ्या आणि या भारतीय प्रथेमागचा आरोग्य रक्षणाचा उद्देश सफल होऊ द्या.