मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केलेल्या वक्तव्यामुळे नवी खळबळ उडाली आहे. कोणाचंही नाव न घेता त्यांनी थेट शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधत “मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत कोण?” असा सवाल उपस्थित केला. या एका वाक्यामुळेच आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीला तोंड फुटल्याचं चित्र आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मुंबईत महायुतीचा बालेकिल्ला उभा राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विरोधकांवर केवळ आरोपांचीच राजकारण खेळत असल्याचा आरोप केला. “आम्ही विकासकामांचा आणि लोककल्याणकारी योजनांचा वेग कायम ठेवला आहे. मात्र विरोधकांकडे बिनबुडाचे आरोप करण्याशिवाय काहीच उरलेलं नाही,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
विरोधकांच्या अधिवेशनातील भूमिकेवरही शिंदेंनी सवाल उपस्थित केले. “काही नेते अधिवेशनासाठी येतात, पण सभागृहात एकही प्रश्न विचारत नाहीत, एकाही विषयावर बोलत नाहीत. आज आगमन आणि उद्या प्रस्थान, एवढाच त्यांचा कार्यक्रम असतो. अशा लोकांना जनतेच्या प्रश्नांची किती काळजी आहे, हे यावरूनच स्पष्ट होतं,” असा आरोप त्यांनी केला.
याचबरोबर, विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरूनही शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “लोकांचे प्रश्न सोडून फक्त विरोधी पक्षनेतेपद मिळावं, यासाठीच त्यांची धडपड सुरू होती. पण त्यासाठी आवश्यक तेवढे आमदार निवडून यावे लागतात. जनतेनेच त्यांना त्या पदापासून दूर ठेवलं,” असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याच्या मागणीवरूनही त्यांनी विरोधकांच्या भूमिकेतील विसंगती दाखवून दिली.
मुंबईकरांसाठी घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचताना शिंदेंनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. मुंबईतील ओसी नसलेल्या सुमारे २० हजार इमारतींना दिलासा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पागडी पद्धत संपुष्टात आणण्याच्या निर्णयामुळे सुमारे १३ हजार इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा त्यांनी केला. नॅशनल पार्क परिसरातील २५ हजार कर्मचाऱ्यांना पाच किलोमीटरच्या परिसरात पर्यायी घरे देण्याची योजना, गिरणी कामगारांच्या चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमांमध्ये बदल, सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात असे निर्णयही त्यांनी अधोरेखित केले.
याशिवाय, ५० एकरांपेक्षा मोठ्या भूखंडांवर क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड झाल्याची माहितीही त्यांनी दिली. “सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा मिळावा, हाच आमचा उद्देश आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं ४० लाख झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याचं स्वप्न आम्ही प्रत्यक्षात उतरवत आहोत,” असं ठाम विधान शिंदेंनी केलं. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेंनी केलेली ही आक्रमक टीका आणि सरकारच्या निर्णयांची मांडणी पाहता, येत्या काळात मुंबईतील राजकारण अधिकच तापणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.