( Khandala Ghat Accident ) जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात एका मोठ्या ट्रकमधून वाहतूक होत असलेले लोखंडी पाइप अचानक मागे सरकल्याने शनिवारी सायंकाळी गंभीर अपघात झाला. खंडाळ्याजवळील मॅजिक पॉईंट येथे घडलेल्या या दुर्घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं. प्राथमिक माहितीनुसार, खोपोलीहून पुण्याकडे निघालेला एक ट्रक घाट चढत असताना चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे ट्रकमध्ये लावलेले लोखंडी पाइप ढकलले गेले आणि मागे येणाऱ्या एका दुचाकीवर व चारचाकीवर पडले.
जखमींवर उपचार सुरू असून घटनेनंतर दस्तुरी येथील महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे, तसेच देवदूत आपत्कालीन सेवा, डेल्टा फोर्स व आयआरबी पेट्रोलिंगच्या पथकांनी अपघातस्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले. या अपघातासंदर्भात खोपोली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार अमोल धायगुडे यांनी दिली.