शिवसेनेचे माजी आमदार अनंत तरे यांचे आज सायंकाळी ठाण्यात निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. मेंदूतील रक्तस्रावामुळे त्यांना दोन महिन्यांपूर्वी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे व भाऊ असा परिवार आहे.
शिवसेनेचे उपनेते असलेले अनंत तरे हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. त्यांनी तीन वेळा ठाण्याचे महापौरपद भूषविले आहे. विधान परिषदेवरही ते निवडून गेले होते. ज्युपिटर रुग्णालयत उपचार सुरू असताना त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली. तरे यांच्या तरे यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवार) दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जुन्या फळीतील तिसऱ्या नेत्याचे निधन
मुंबईच्या परळ-लालबाग भागातील शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे 19 डिसेंबरला गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. मोहन रावले हे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. तर, 11 जानेवारीला शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. 2003पासून ते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष होते.