( Rain Update) मराठवाड्यात हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होत असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 16 जुलै रोजी बीड, लातूर, धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या भागांतील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत सध्या कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नसला, तरी ढगाळ हवामान आणि विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या पुढील अंदाजानुसार, या भागांत आगामी आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता असून त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी तयारीत राहावे, असा सल्ला दिला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही आज ढगाळ वातावरण राहणार आहे. दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे तापमान वाढले असून नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. या भागांमध्ये सध्या तापमान 33 अंश सेल्सियसच्या पुढे गेले असून, हवामान खात्याने येथे सुद्धा कोणताही पावसाचा अलर्ट दिलेला नाही.
दरम्यान, मराठवाड्यात खरीप हंगाम सुरू झाला असला तरी अद्याप पुरेसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.