(Baramati Malegaon Sahakari Sakhar Karkhana ) माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून 2025 रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र शरद पवार यांनी मतदान केलं नाही.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच फेरीत मजबूत कामगिरी करत विजय मिळवला आहे. तरी उर्वरित जागांचा निकाल येणे बाकी आहे आणि त्यामुळे अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही.
यंदाच्या निवडणुकीत चार वेगवेगळ्या पॅनेल्समध्ये तुफान चुरस पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘निळकंठेश्वर पॅनेल’, शरद पवार आणि युगेंद्र पवार यांच्या ‘बळीराजा बचाव पॅनेल’सोबतच चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनेल’ यामध्ये प्रमुख स्पर्धा आहे. एकूण 90 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर मतदार संख्या 19 हजारांहून अधिक असून 88.48 टक्के मतदान झाले आहे.
ब वर्गातील मतमोजणी पूर्ण झाली असून अजित पवार यांना तब्बल 91 मते मिळाली आहेत. तर त्यांच्याविरुद्ध असलेल्या सहकार बचाव पॅनेलचे भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मते मिळाली आहेत. यावरून ब वर्गातून अजित पवारांचा विजय निश्चित झाला आहे.
मात्र सुरुवातीच्या कलांवरून असे दिसते की, अनेक ठिकाणी क्रॉस व्होटिंग झाले असून, त्याचे परिणाम अंतिम निकालावर दिसून येतील. त्यामुळे अजित पवारांच्या विजयासोबतच निवडणुकीत काही अनपेक्षित वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्वरित 20 जागांचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.