राजकारण

तुमची पदं भाजपामुळे आहेत हे विसरू नका; भाजप नेत्याचा शिंदे गटाला इशारा

भाजप-शिंदे गटाच्या युतीत काही आलबेल नसल्याचे चर्चांना उधाण आले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : तुमची पदं भारतीय जनता पार्टीमुळे आहेत हे विसरू नका, अशा शब्दात भाजपने थेट उद्योग मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांना इशारा दिला आहे. भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ही इशारा दिला आहे. यामुळे भाजप-शिंदे गटाच्या युतीत काही आलबेल नसल्याचे चर्चांना उधाण आले आहे. उदय सामंत, दादा भुसे या दोघांनीही असंवेदनशीलतेच दर्शन घडवलं असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले आहेत अजित चव्हाण?

सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक किती उथळ झाले आहेत. याचा अतिशय धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांना एका अतिशय अपमानस्पद प्रकाराला सामोरे जावे लागले. औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटन वेळी उदय सामंत व दादा भुसे यांच्या उपस्थितीत निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे या कायम मिरवून घेण्यासाठी पुढे-पुढे करणाऱ्या व्यक्तीने सीमा हिरेंना मागून धक्का दिला आणि त्या पडल्या. याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

अनावधानाने असं होऊ शकतं, कुणाचाही कुणालाही धक्का लागू शकतो इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण, आपल्यामुळे कुणीतरी पडलं त्याची माफी मागणं हे सौजन्य आहे. ते साधं सौजन्यही न दाखवता कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उदय सामंत, दादा भुसे या दोघांनीही असंवेदनशीलतेच दर्शन घडवलं.

आपल्या एका लोकप्रतिनिधी भगिनीला अशा पद्धतीने वागणूक मिळत असताना तातडीने तो कार्यक्रम थांबवून आधी दखल घेऊन त्यांची विचारपूस करायला हवी होती. मात्र, असं न करता सीमा हिरे तिथून निघून गेल्या. तरीदेखील त्याची दखल न घेता उद्घाटन सोहळा पार पाडणाऱ्या मंडळींचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना आठवण करून देतो की त्यांची मंत्रीपद ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे आणि भारतीय जनता पक्षामुळे आहे, असा इशाराही अजित चव्हाण यांनी दिला आहे.

सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना लोक आपल्याला पाहत असतात. इतकी संस्कारहीन, संवेदनाहीन वागणूक नाशिककरांना दिसली. सीमा हिरे या आमदार आहेत म्हणून नाही तर या ठिकाणी कुणीही माणूस असता तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसा बरोबर देखील असं जर झालं तर ते अतिशय वाईट झालं असत. मात्र समस्त नाशिककरांच्या आदरास पात्र असलेल्या लाखो मतांनी भाजपाच्या तिकिटावर लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदारांचा अपमान होतो. आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मंत्री बघत बसत असतील तर व्यक्ती म्हणून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील घसरणारा हा स्तर पाहून वाईट वाटत आहेच, पण पक्षाचा सह मुख्यप्रवक्ता म्हणून या प्रकाराची अतिशय गंभीर दखल घेऊन मी याचा निषेध व्यक्त करतो. राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ही नाराजी पोचवली जाईल आणि त्यांनाही झालेल्या प्रकार आवडेल असं मला वाटत नाही, असेही अजित चव्हाण यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप