राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सध्या पार पडत आहे. या अधिवेशात मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची प्रकरणं गाजत असतांनाच इम्तियाज जलील यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर इंडस्ट्रियल प्लॉटचा वापर उद्देशचा बदल करून हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फक्त खोटे आणि बेछूट आरोप करत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. असा प्रत्यारोप त्यांनी जलील यांच्यावर केला.
काय म्हणाले खैरे?
इम्तियाज जलील हे विकासकामांवर कधीच बोलत नाहीत. फक्त खोटे आणि बेछूट आरोप करत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आतापर्यंत त्यांनी केलेले किता आरोप सिद्ध झाले हे देखील बघितले पाहिजे. राहिला प्रश्न सुभाष देसाई यांचा तर ते पालकमंत्री असतांना कधीही कामा व्यतिरिक्त कुणाला जास्त बोलत नव्हते. फक्त जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून ते जिल्ह्याते प्रश्न मार्गी लावायचे.
शांत स्वभावाचे देसाई कधीही चुकीचे काम करणार नाहीत, याचा मला विश्वास आहे. इम्तियाज जलील यांनी आरोप केले आहेत, तर आता ते सिद्ध करून दाखवावेत. उलट पालकमंत्री असतांना इम्तियाज जलील यांना त्यांनी डीपीडीसीमधून भरघोस निधी दिला. माझ्यापेक्षा जास्त जवळपास ३ कोटी रुपये निधी देसाई यांनी त्यांना दिला, आता तेच त्यांच्यावर उलटले. इम्तियाज यांच्या आरोपात अजिबात तथ्य नाही, असा कुठलाही घोटाळा झालेला नाही, असा दावा देखील खैरे यांनी केला.
काय केला होता जलील यांनी आरोप?
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात उद्योग येणे बंद झाले आहेत. तर गेल्या काही काळात औरंगाबादमध्ये एमआयडीसीच्या जागा विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे. तर महाविकास आघाडीत उद्योग मंत्री राहिलेले आणि औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या कार्यकाळात कोणतेही उद्योग आणले नाहीत. मात्र उद्योगासाठी असलेल्या एमआयडीसीच्या जागा मात्र त्यांनी विक्री केल्या असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.
इंडस्ट्रियल प्लॉटचा वापर उद्देशचा बदल करून हजारो कोटींचा घोटाळा देसाई यांनी केला. बिल्डरांकडून कोट्यावधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले. या सर्व प्रकरणात देसाई यांचा मुलाचा सहभाग होता. देसाई यांचा मुलगा संबधित बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवित होता. तर हा सर्व घोटाळा तब्बल एक हजार कोटीच्या घरात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.