राजकारण

'जनाब ठाकरे' म्हणत बावनकुळेंकडून उध्दव ठाकरेंवर टीका; काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून...

मविआ सरकारच्या काळातील घटनांची आठवण करून देत बावनकुळेंकडून टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कर्नाटकमधील निवडणुकीचे वातावरण तापले असून सर्वपक्षीयांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली म्हणून मतदान करा, असे आवाहन कर्नाटकच्या जनतेला केले आहे. तर, उध्दव ठाकरेंनी जय भवानी जय शिवाजी घोषणेने उत्तर दिले आहे. यावर भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'जनाब ठाकरे' असा उल्लेख करत मविआ सरकारच्या काळातील घटनांची आठवण करून देत टीका केली आहे.

उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचं कोण आहे? तुमच्या अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्रानं बघितलं आहे. तुमच्या विरोधात टीका केली म्हणून नारायण राणे यांना तुरुंगात टाकलं, त्याला हुकूमशाही म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणं, याला हुकूमशाही म्हणतात. तुमच्या विरोधात बोललं म्हणून पत्रकाराला घरातून अटक करणं याला हुकूमशाही म्हणतात. विरोधात भूमिका घेतली म्हणून अभिनेत्रीचं घर तोडणं याला हुकूमशाही म्हणतात. त्यामुळे मोदींना हुकूमशाही प्रवृत्तीचं म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा, असे बावनकुळेंनी म्हंटले आहे.

राहिला प्रश्न ‘जय बजरंगबली‘ नारा देण्याचा तर आम्हाला ‘जय श्रीराम‘ आणि ‘जय बजरंगबली‘ जयघोष करण्याचा अभिमान आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून तुम्हाला मात्र हिंदुत्वाचा विसर पडला आहे. रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाला तुम्ही साधं ट्विट करू शकला नाहीत. त्यामुळे तुम्हाला ‘जय बजरंग बली‘चा नारा दिल्यावर दुःख वाटणं साहजिकच आहे. कारण तुम्ही आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत आहात, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

मला व्यक्तीचा नाही तर हुकुमशाही प्रवृत्तीचा पराभव करायचा आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, बजरंग बली की जय असे म्हणून मतदान करा. तर, मराठी माणसांनी जय भवानी जय शिवाजी बोलून एकजूट जपणाऱ्या माणसांला निवडून द्या. मराठी माणसांची वज्रमुठ कर्नाटकात दाखवून द्या व मराठी द्रेष्ट्यांना हरवा, असे आवाहन उध्दव ठाकरेंनी सीमाभागातील नागरिकांना केले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला