बीड : संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांनी मात्र फिरवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नाराजीच्या चर्चेला उधाण आले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे यांच्याशी माझं दरदिवशी बोलणं होत असतं, ताई भाजपला सोडायला जाणार नाही त्यांच्या रक्तात भाजप आहे. भाजपला मोठं करण्यात गोपीनाथ मुंडे यांच योगदान आहेत. त्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यामुळे त्या जात नसतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. मुंबईच्या विकासाला मोदी काय देणार याकडे लक्ष आहे. कारण नागपूरला आले त्यांनी कोट्यवधी रुपयांची भेट दिली. मुंबईत गेल्या अडीच वर्षात डेव्हलपमेंट झाली नाही. मात्र, आता मुबंईत आल्यावर मुंबईकरांना मोठं गिफ्ट देतील. मोदी येणार त्याची जोरदार तयारी सध्या सुरु आहे याची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर आहे. मोदी येतात हे खूप आहे त्यांना ऐकायला लोकांना बोलवण्याची गरज नाही ते स्वतः येतात, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान, बीडमध्ये मागील 15 दिवसांमधील फडणवीसांचा हा दुसरा दौरा आहे. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात फडणवीसांचं विशेष लक्ष असल्याचं यातून दिसतं आहे. आज या ठिकाणी फडणवीस येणार असले तरी पंकजा आणि प्रीतम मुंडे या उपस्थित राहणार नाही. आजारी असल्याने पंकजा मुंडे यांनी गैरहजर राहणार आहेत. तर प्रीतम मुंडे देखील जिल्ह्यात नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.