मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरून मनसेची आज कोकण जागर यात्रा अमित ठाकरेंच्या नेतृत्वात निघाली आहे. या यात्रेवर दिपाली सय्यद यांनी जोरदार टीका केली आहे. मनसे हा चंद्रासारखा दिसणारा पक्ष असून श्रेय घेण्यासाठी युवा नेते रस्त्यावर, असा निशाणा दीपाली सय्यद यांनी साधला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील मनसेच्या जागर यात्रेवर शिंदे गटाच्या दिपाली सय्यद यांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या प्रयत्नाने महामार्ग ६६ एक लेन सुरू होणार आहे. मनसेच्या शब्दाला किंमत नाही! चांद्रयान-३ चंद्रावर उतरले, भारताने तेथील सत्ता मनसेला एकतर्फी द्यावी. मनसे तेथील सर्व खड्डे भरून काढेल, असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे. मनसे हा चंद्रासारखा दिसणारा पक्ष आहे. श्रेय घेण्यासाठी युवानेते रस्त्यावर उतरलेत, अशीही टीका दीपाली सय्यद यांनी केली आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून मनसेची आज कोकण जागर यात्रा निघाली आहे. रायगड ते रत्नागिरीपर्यंत या जागर यात्रेदरम्यान 8 ठिकाणी मनसे आंदोलन करणार आहे. मनसेच्या या जागर यात्रेचं नेतृत्व मनसे नेते अमित ठाकरे करत आहेत. यावेळी अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला रस्त्यांच्या प्रश्नांवरुन खळखट्याक करण्याचा इशारा दिला आहे.