राजकारण

एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व राष्ट्रवादीच्या फुटीर गटासोबत सुखात नांदणार; पटोलेंचा घणाघात

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाचे तोडफोडीचे महाभारत केले आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटत आहे. हिमाचल प्रदेश व कर्नाटकात काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्येही भाजपाचा दारुण पराभव होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात व केंद्रातही परिवर्तन करण्याचा जनतेचा इरादा दिसत आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आघाडीला जनतेचे समर्थन मिळत असल्याचे दिसत असल्याने फोडाफोडीचे राजकारण केले आहे. ईडी सरकार बहुमताचा दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेण्याची गरज नव्हती पण आमागी निवडणुकीत लाज राखण्यासाठी फोडीफोडीशिवाय भाजपाकडे दुसरा पर्याय नव्हता त्याच मानसिकतेतून हा सत्तापिपासू उद्योग केला आहे.

उद्धव ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याने हिंदुत्व धोक्यात आल्याचा आव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना केला होता. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याच्या वल्गनाही ते करत असतात. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत सत्तेत बसताना शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का? याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. आता भाजपा, नरेंद्र मोदी व फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सत्तेत बसले आहेत, याचे उत्तरही महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे लागणार आहे.

कोण-कोणाबरोबर सत्तेसाठी घरोबा करत आहे हे जनतेला स्पष्ट दिसत आहे. जनतेला हे फोडाफोडीचे राजकारण अजिबात आवडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने जाण्याने काँग्रेस आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही उलट काँग्रेस पक्ष जास्त ताकदीने व जनतेच्या विश्वासावर मोठ्या बहुमताने निवडून येईल. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तसेच केंद्रातही सरकार सत्तेत येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."