राजकारण

राम मंदिर सोहळ्यात सहभागी होणार? आंबेडकर म्हणाले, भाजप-आरएसएसने...

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, या सोहळ्याला जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर, प्रकाश आंबेडकर यांनाही सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु, या सोहळ्याला जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी एक पत्रच ट्विटरवर शेअर केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या अभिषेकासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे. धार्मिक सोहळा हा निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

माझे आजोबा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की, राजकीय पक्षांनी धर्म, पंथ देशाच्या वर ठेवला तर आमचे स्वातंत्र्य दुसर्‍यांदा धोक्यात येईल आणि यावेळी कदाचित आम्ही ते कायमचे गमावू. आज ही भीती खरी ठरली आहे. धर्म आणि पंथाला देशापेक्षा वरचे स्थान देणाऱ्या भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे, असेही आंबेडकरांनी म्हंटले आहे.

दरम्यान, देशातील चारही पीठांच्या शंकराचार्यांनी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हवी, असे मत त्यांनी मांडले आहे. तर, विरोधकांनीही या सोहळ्याला जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. अशातच, आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होऊ नये, अशी मागणीदेखील केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा