raj thackeray criticizes uddhav thackeray : बाळासाहेब असते तर आजची परिस्थिती ओढावली नसती. शिवसेना हा पक्ष किंवा संस्था म्हणून पाहू नका. मुळात एका विचाराने बांधली गेलेली माणसं होती. बाळासाहेबांच्या विचारांवर ती माणसं चालत होती. बाळासाहेब होते, तोपर्यंत विचार होते. ते गेले, विचारही गेले. बाळासाहेब असते तर आजची परिस्थिती ओढावली नसती, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या अभूतपूर्व बंडावर भाष्य केलं. राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिली. (raj thackeray criticizes uddhav thackeray)
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या इतिहासातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. शिवसेनेच्या महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना पक्षाचा कार्याध्यक्ष करण्याचा ठराव स्वतः राज ठाकरे यांनी मांडला होता. आता तो ठराव मांडला याबाबत पश्चाताप होतो का? असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला. यावर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. तसेच त्या ठरावावर कोणताही पश्चाताप होत नसल्याचं सांगितलं.
बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. याला दुसरं कोणतंच कारण नाही. तुमची वागणूक, सगळ्या गोष्टी पैशात मोजायच्या, पैशात तोलायच्या. पक्षाकडे बघायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. आजही सगळे लोक काय सांगत आहेत? लोक म्हणतात आज जे सुरू आहे त्यात उद्धव ठाकरेंना सहानुभुती मिळत आहे. मला हे कळालं नाही. यात सहानुभुतीचा काय संबंध?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
शिवसेनेवर बोलताना राज ठाकरे यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी जोतिबा फुले यांनी त्यावेळी एक बँक काढली असती आणि ते गेल्यावर ती बँक डबघाईला आली असती तर त्या बँकेत तुम्ही पैसे टाकाल का? त्यावेळी ती बँक टिळकांनी किंवा बाबासाहेबांनी काढली म्हणून तुम्ही पैसे टाकणार नाही.
शिंदे गट मनसेमध्ये विलीन होईल अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. त्यावर राज यांनी भाष्य केलं. शिंदे गटाकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू, असं ठाकरे म्हणाले. चाळीस आमदारांचं विलिनीकरण हा तांत्रिक मुद्दा आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये मी हा विषय वाचला. त्या आमदारांकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव मी नक्कीच विचार करेन, असं राज यांनी म्हटलं. इतके आमदार पक्षात आले तर मनसे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं का? असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्यासाठी आधी मनसैनिक. बाकीचे नंतर, असं उत्तर राज यांनी दिलं.