राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये विविध विषयावरून आरोप- प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबाबत मोठी माहितीसमोर आली. नितीन गडकरी यांच्या विभागावर कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप करत विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नितीन गडकरींबाबत मोठं विधान करत त्यांनी थेट पंतप्रधान पदाची ऑफर दिली.
नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?
नितीन गडकरींबाबत बोलताना राऊत म्हणाले की, 'नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील एक नेतृत्व लोकप्रिय होत आहे. उद्या ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट दिल्लीच्या राजकारण्यांनी त्यांना संपवण्याचा कट केला आहे. परंतु, त्यांचा हा कट उधळून लावण्याचे काम महाराष्ट्र करेल. आमची नितीन गडकरींना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी त्यांना दाखवावं.' असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, 'गडकरी त्यांना कशासाठी घाबरत आहेत. त्यांनी फक्त आवाज द्यावा. नितीन गडकरींनी ‘इंडिया’ आघाडीत यावं. आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरेही देतील,' असे बोलत त्यांनी नितीन गडकरी यांना आवाहन केलं आहे.