पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे या दिवाळीनिमित्त कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी आले होते. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेर येथील निवासस्थानी पवार कुटुंबीय एकत्र आले होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दरवर्षी पवार कुटुंब बारामतीमध्ये एकत्र येत असते. प्रताप पवारांच्या पत्नी आमच्या काकी आजारी आहेत. त्यामुळं त्या यावर्षी येवू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही सगळे आज पुण्यात दिवाळीसाठी एकत्र आलो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमचा पाडवा, भाऊबीज यावर्षीही होणार. आम्ही सगळे सनासाठी एकत्र येवू. दादांना कितपत शक्य होईल माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
राजकीय मतभेद असले तरी आम्ही वैयक्तिक संबंध जपून असतो. एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांना भेटतो. प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यात फरक असतो. दादांची तब्येत अजूनही पूर्णपणे बरी नाही. पोस्ट डेंगी लक्षणं आहेत. त्यांनी काळजी घ्यायला हवी. दिल्लीत गेल्याचे माहिती नाही. पण तिथे प्रदूषण खूप आहे. सगळ्यांनीच दिल्लीत खबरदारी घ्यावी, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.