नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली.
या महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला. हे तेवढेच खरे आहे. कारण त्यांची मते भरपूर घेतली. महायुतीने घेतली, केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही. तिघांनी त्यांना वापरलं, सत्ता आली की बाजूला केलं. त्यामुळे नवा पर्याय ते शोधत असतील. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु तो निर्णय काय घेतात त्यावरही या राज्यातील ओबीसी समाज ठरवेल.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, भुजबळांनी जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता ओबीसी चळवळीसाठी घ्यावी. त्यांच्यासोबत आम्ही राहू आणि लढायला सिद्ध राहू. अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.