मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत अवघ्या ३८ तासांवर येऊन ठेपली असतानाच सत्ताधारी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. अद्याप उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही, तसेच एबी फॉर्मही वितरित न झाल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम आणि नाराजी पसरली आहे. एकीकडे भाजपने मुंबईत निवडणूक यंत्रणा पूर्ण ताकदीने कार्यान्वित केली असताना, दुसरीकडे शिंदे गटाची शिवसेना मात्र निर्णयप्रक्रियेतच अडकून पडल्याचे दिसत आहे. यामुळे “शिवसेना नेमकी चालवतोय तरी कोण?” असा सवाल आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे.
जागावाटपाचा तिढा आकड्यांमध्येच अडकले नेतृत्व
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत शिवसेना शिंदे गटाने तब्बल १२५ जागांची ठाम मागणी केली होती. मुंबईत आपली संघटनात्मक ताकद आणि सत्तेतली भागीदारी याचा दाखला देत ही मागणी पुढे रेटण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष चर्चांमध्ये शिवसेनेच्या पदरात फक्त ८० ते ८७ जागा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आकड्यांमधील तफावतच सध्या पक्षातील अस्वस्थतेचं मुख्य कारण ठरत आहे. “महायुतीत असूनही शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जाते,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावत चालली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार तयार असताना, जागाच न मिळाल्याने त्यांची राजकीय कोंडी झाली आहे.
‘महायुतीत शिवसेनेची गळचेपी?’ कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज
पक्षांतर्गत चर्चांमध्ये आता “महायुतीत नेहमीच शिवसेनेची गळचेपी होते” अशी कुजबुज उघडपणे ऐकू येऊ लागली आहे. सत्तेत सहभागी असूनही निर्णय प्रक्रियेत अपेक्षित वजन मिळत नसल्याची भावना अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेने आधीच तयारी करून ठेवली आहे. प्रचाराची रणनीती, स्थानिक संपर्क, कार्यकर्त्यांची फळी सज्ज असताना एबी फॉर्म मिळत नसल्याने ही संपूर्ण यंत्रणा ठप्प झाल्याचं चित्र आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर “अर्ज भरण्याची वेळ आली तरी आम्हाला अधिकृत मान्यता मिळालेली नाही,” अशी खंत व्यक्त केली आहे.
भाजप आघाडीवर, शिवसेना प्रतीक्षेत
या सगळ्या गोंधळात भाजप मात्र आक्रमक भूमिकेत दिसत आहे. उमेदवार निश्चिती, प्रचाराची दिशा, सोशल मीडिया आणि प्रभागनिहाय बैठकांमध्ये भाजपने स्पष्ट आघाडी घेतली आहे. याउलट, शिवसेनेचे अनेक उमेदवार अजूनही मुंबईतील निर्णयांची वाट पाहत बसले आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते, हा उशीर केवळ प्रशासकीय नाही तर नेतृत्वातील समन्वयाचा अभाव दर्शवणारा आहे. “निवडणूक जिंकायची असेल तर शेवटच्या क्षणी धावपळ करून उपयोग होत नाही,” असा टोला काही ज्येष्ठ नेत्यांकडूनही अप्रत्यक्षपणे लगावला जात आहे.
एकनाथ शिंदे नेमके कुठे?
या साऱ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी या कोंडीवर ठोस निर्णय का घेतलेला नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. “निर्णय लवकर न झाल्यास नुकसान अटळ आहे,” अशी भीती शिवसेनेच्या गोटात व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई नसून, मुंबईतील राजकीय वर्चस्वाची चाचणी मानली जाते. अशा वेळी शिवसेनेत सुरू असलेली ही अस्वस्थता महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अर्ज भरण्याची वेळ जवळ येत असताना, शिवसेना शिंदे गट हा गोंधळ आवरणार की अंतर्गत नाराजी उफाळून बाहेर येणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.