थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
पुण्यातील एमपी/एमएलए विशेष न्यायालयात सुरु असलेल्या सावरकर विरुद्ध राहुल गांधी मानहानी प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या. खासदार राहुल गांधी यांच्यावर दाखल झालेल्या खटल्याच्या मूळ प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मागील सुनावणीत फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये गंभीर आणि मूलभूत त्रुटी आढळल्याचे उघड झाल्यानंतर, ॲड. मिलिंद पवार यांनी काही आक्षेप मांडले. न्यायालयात दाखल केलेल्या सीडी, ऑनलाईन लिंक्स आणि डिजिटल सामग्री तांत्रिकदृष्ट्या त्रुटीपूर्ण असल्याचे बचाव पक्षाचे वकील ॲड. मिलींद पवार यांनी सांगितले व न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.
ॲड. पवार यांनी दाखल केलेल्या अर्जात असा धक्कादायक दावा करण्यात आला आहे की, फिर्यादीकडे कोणतेही ठोस पुरावे नसतानाही, तत्कालीन न्यायालयावर दबाव निर्माण करून राहूल गांधी यांच्या विरोधात समन्स मिळवले गेले. अर्जात पुढे असेही नमूद आहे की, काही बाबी जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या. फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी ॲड. पवार यांचे हे आरोप “बिनबुडाचे” असल्याचे म्हणत तात्काळ हरकत घेतली.
ॲड. पवार यांनी खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ॲड. पवार यांनी न्यायालयात सविस्तर लेखी खुलासा दाखल करून आपल्या आरोपांची भूमिका अधिक तीव्रपणे मांडली. त्यावरन्यायलयाने ॲड. पवार यांना निर्देश दिले की जर तुम्हाला २०२३ मधील इश्यु समन्सची न्यायालयाच्या ऑर्डरवर काही शंका असेल तर ती ऑर्डर चॅलेंज करा. जी ऑर्डर चॅलेंज केली नाही त्यावर भाष्य करणे टाळावे असे आदेशपारित केले आहेत. या नवीन घटनाक्रमामुळे खटल्याच्या मूळ पायावरच प्रश्न निर्माण झाले असून, पुढील सुनावणीवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या खटल्याची पुढील सुनावनी ०५ डिसेंबर २०२५ या तारखेस होणार आहे.
ॲड. मिलिंद पवार यांनी न्यायालयावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला.
फिर्यादीने दिलेल्या डिजिटल पुराव्यांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या.
न्यायालयाने स्पष्ट सांगितले—समन्स आदेशावर शंका असल्यास तो स्वतंत्रपणे चॅलेंज करावा.
या नव्या वादामुळे संपूर्ण खटल्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.