मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. याशिवाय, हार्बर मार्गावरील पनवेल - वाशी अप आणि डाऊन मार्गावर तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाईल. ब्लॉक कालावधीत विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध होणार नाही.
मध्य रेल्वे मुख्य मार्ग
● कुठे : माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
● कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
● परिणाम : ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. ब्लॉक काळात विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर येथे लोकल सेवा उपलब्ध नसेल.
हार्बर मार्ग
● कुठे : पनवेल - वाशी अप आणि डाऊन मार्गावर ● कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
● परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल-सीएसएमटी अप मार्गावरील आणि सीएसएमटी-बेलापूर/पनवेल डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द असेल. ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल-ठाणे लोकल सेवा रद्द असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गिका सुरू असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका सुरू असेल.
पश्चिम रेल्वे
● कुठे : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
● कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
● परिणाम : अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावतील.