महाराष्ट्र

विक्रम गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून श्रध्दांजली

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवरही शोककळा पसरली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी विक्रम गोखलेंच्या निधनाने अतीव दुःख झाले असल्याचे म्हंटले आहे. तर, गोखलेंच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले असल्याची शोकसंवेदना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्या चतुरस्त्र अभिनयाने मराठी व हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांचा जाण्याने भारतीय रंगभूमी व चित्रपटक्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

तर, देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टी गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने सिनेमा जगत आणि नाट्यसृष्टीचे कधीही भरुन न निघणारे नुकसान झाले आहे. एक चतुरस्त्र अभिनेता, दिग्दर्शक, नाट्य कलावंतच नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा मोठ्या मनाचे, व्यापक सामाजिक भान असलेले हे व्यक्तिमत्त्व होते.

भारदस्त अभिनेता, देहबोली आणि डोळ्यातून भाव व्यक्त करण्याचे त्यांचे कसब आणि आत्मविश्वासी बाणा हे क्वचितच कुणाला लाभले. अभिनयाच्या क्षेत्रातील त्यांचा परिचय तर मोठा होताच, पण सैन्यदलात काम करताना अपंगत्त्व आलेल्यांच्या कुटुंबियांना मदत किंवा निराधार बालकांचे शिक्षण यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. विक्रम गोखले यांच्या निधनाने अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ आपल्यातून हरपले आहे. प्रत्येक भूमिकेला सुयोग्य न्याय देणार्‍या, ती व्यक्तिरेखा जिवंत साकारणार्‍या विक्रम गोखले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77 व्या वर्षी पुण्यात निधन झालं. जवळपास गेल्या 18 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आज संध्याकाळी पुण्यातील स्मशानभूमीत विक्रम गोखलेंवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मंधाना-शेफालीचा धमाका! टीम इंडियाची विजयी हॅट्ट्रिक; बांगलादेशचा धुव्वा उडवून T20 मालिका जिंकली

"धेर्यशील माने किंवा इतर उमेदवार महत्त्वाचे नाहीत, कारण...", हातकणंगलेत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Daily Horoscope 3 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष ३ मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"ज्यांनी गुन्हा केला नाही, त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम मोदी सरकारनं केलं", सांगलीच्या सभेत शरद पवारांचा हल्लाबोल