कोट्यवधींच्या इमारतीचा गैरवापर, जिल्हा प्रशासनाची झोप उडणार का?
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात असलेले रिठद येथील आयुष्मान प्राथमिक आरोग्य केंद्राचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्राची इमारत आरोग्यसेवेऐवजी मासळी विक्रीसाठी वापरली जात आहे. कंत्राटदाराकडून खासगी व्यक्तीला भाडे तत्वावर वापरासाठी दिली गेल्याचे उघड झाले आहे. ‘लोकशाही मराठी’ने या प्रकरणाचा रिअॅलिटी चेक करून खळबळजनक सत्य समोर आणले आहे.
ठळक मुद्दे:
नवीन बांधलेली आयुष्मान आरोग्य केंद्राची इमारत आरोग्यसेवेसाठी वापरली जात नसून तिथे मासळी विक्री सुरू आहे.
ही इमारत भाडे तत्वावर खासगी व्यक्तीला दिल्याची माहिती; मात्र भाडेपट्ट्याचे अधिकृत दस्तऐवज उपलब्ध नाहीत.
महिला व प्रसूती रुग्णांना योग्य सेवा न मिळाल्यामुळे वाशीम येथील जुन्या इमारतीतच उपचार घ्यावे लागत आहेत.
गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट, तर प्रशासन अजूनही गप्प.
आरोग्यमंत्री वाशिमच्या दौर्यावर आले असतानाही हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही, की दुर्लक्ष करण्यात आलं? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधी वापरून उभारलेली इमारत आरोग्यसेवेसाठी वापरली जात नसल्याने सरकारी यंत्रणेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
' लोकशाही मराठी'चा रिअॅलिटी चेक:
मासळीचा बाजार आरोग्य केंद्रातच " लोकशाही मराठी"च्या पत्रकारांनी प्रत्यक्ष स्थळी भेट दिली असता, त्या इमारतीत मासळी विक्री सुरू असल्याचं दिसून आलं. जिथे रुग्णसेवेचं केंद्र असावं, तिथे बाजार सुरू असणं हे केवळ धक्कादायकच नव्हे, तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेची थट्टा आहे.
प्रशासनाकडून माहिती लपवली जातेय?
या इमारतीत कोण राहतंय, कोण चालवतंय मासळी विक्री, कोणत्या अटींवर इमारत भाड्याने दिली गेली – या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत. स्थानिक अधिकार्यांनी थेट उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. गावकरी विशेषतः महिला या प्रकरणामुळे संतप्त आहेत. आरोग्य केंद्र हे गावात रुग्णांसाठी प्राथमिक गरज असताना त्याचा वापर अन्य कारणांसाठी होणं, हे अमान्य असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. " लोकशाही मराठी"ने हा संपूर्ण प्रकार दस्तऐवजासह आणि दृश्य स्वरूपात उघड केला आहे. आता तरी जिल्हा प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेईल का? दोषींवर कारवाई होईल का? की पुन्हा हे प्रकरण गुपचूप मिटवलं जाईल?