थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Raj Thackeray) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅली, मुलाखतींचे आयोजन करण्यात येत आहे. यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी अदानी आणि भाजपवर टीका केली. या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी सवाल विचारला की," मराठी माणूस हा कामगार, श्रमिक, लढवय्या होता. आज तो बाहेर गेला आणि संपूर्ण मुंबईची संपत्ती ही एका विशिष्ट वर्गाच्या हातात आहे, ती सातत्याने गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होतोय. याचा अर्थ असा की, मुंबईत तुमचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील, संपत्ती मात्र आमच्याकडे राहील."
यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, "मुंबईनंतर नवी मुंबईत जे विमानतळ झालंय, मुंबईतल्या हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो तिथे नवी मुंबईतल्या विमानतळावर हलवतील. आता सुरुवात झालेलीच आहे, पुढे हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईत हलवणार. आताचं मुंबईतलं विमानतळ अदानीकडे आहेच. आताच्या विमानतळाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलंत तर त्यात कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदाने बसतील इतपं ते मोठं आहे. म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक, इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईला हलवायचं आणि इथल्या विमानतळाचा सगळा भाग विकायला काढायचा हाच त्यांचा प्लॅन आहे."असे राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर “हे सगळं मोदी, शहा राज्यकर्ते झाल्यामुळे होतंय का,” असा सवाल संजय राऊतांनी केला.
यावर प्रतिक्रिया देत राज ठाकरे म्हणाले की, "व्यवसाय करताना तर चोऱ्यामाऱ्या सगळेच करत असतील, पण अदानी आणि अंबानी यांच्यातील मोठा फरक बघायचा असेल तर तो हा आहे की, मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हे मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला आहे. अदानीचा विस्तार हे मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर अदानीला अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. मला नेहमी एक प्रश्न पडतो. भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचाय की, समजा तिथे भारतीय जनता पक्षाऐवजी काँग्रेसचे सरकार किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षाचं सरकार असतं आणि एखाद्या केंद्रात बसलेल्या सरकारने काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने जर एकाच उद्योगपतीवर मेहरबानी केली असती, तर भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे रिअॅक्ट झाला असता?" असे राज ठाकरे म्हणाले.
Summary
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रसिद्ध झाली
अदानी-अंबानी यांच्यात फरक काय? राज ठाकरेंनी सांगितले
"मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हे मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला"