( Mumbai Dabbawala ) मुंबईच्या डबेवाल्यांकडून दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. वाढती महागाई, रेल्वे आणि रस्तेवाहतुकीचे वाढलेले दर याचा फटका सर्वसामान्यांसह मुंबईच्या डबेवाल्यांनाही बसला. त्यामुळे मुंबईकरांचे दुपारचे जेवण चक्क 200 रुपयांनी महागले आहे. यामुळे नोकरदारवर्गाच्या खिशाला कात्री बसली आहे.
मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन आणि नुतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईचे डबेवाले हे मुंबई आणि उपनगरांमध्ये 1890 पासून अविरतपणे घर आणि ऑफिसमध्ये असणाऱ्या मुंबईकरांची भूक भागवत आहे.
मुंबईच्या डबेवाल्यांवर आता महागाई आणि इंधनखर्चाचा वाढता आर्थिक भार येऊन पडला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रत्येक डब्यामागे २०० रुपयांची वाढ केली आहे. याच महिन्यापासून ही दरवाढ केल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.
पाच किलोमीटरच्या आत असणाऱ्या प्रत्येक डब्यामागे आता मुंबईकरांना 1400 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापेक्षा जास्त अंतर असल्यास अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत. यामुळे आता नोकरदारवर्गाला आर्थिक खर्चाचा अतिरिक्त भार सहन करत दुपारच्या डब्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.