मुंबईमध्ये परप्रांतीयांचे वाढते लोंढे आणि त्यांची मुंबईमधील मराठी माणसावर चाललेली अरेरावी ही वाढतच चालली असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे मुंबईमधील मराठी माणसाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक घटना काल घाटकोपरमधील रायगड चौकात घडलेली पाहायला मिळाली आहे. या चौकातील शेजारी-शेजारी असलेल्या गुजराती आणि मराठी कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि याच कारणावरून मराठी कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याआधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे मराठी माणसाला आता मुंबईमध्ये अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे दिसत आहे.
घाटकोपरमधील रायगड चौकात राहणाऱ्या मराठी कुटुंबाने आपल्या घरात कुत्रा पाळला होता. या कुटुंबाच्या बाजूलाच एक गुजराती कुटुंब राहत आहे. त्या कुत्र्यावरून वादाला सुरुवात झाली. त्या गुजराती कुटुंबाने यावर विरोध दर्शवला आणि बघताबघता किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. ही सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. गुजराती कुटुंबातील तीन तरुण पुरुष मराठी कुटुंबाच्या घरी घुसून मारहाण करत असल्याचे दृश्य त्या सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी मराठी कुटुंबाने घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही. त्यामुळे आता यावर पोलीस काय अॅक्शन घेतील आणि राजकीय वर्तुळात याचे काय पडसाद उमटतील, हे पाहावे लागेल.
हेही वाचा