चित्रपटसृष्टीतून काही काळापासून दूर असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'आशिक बनाया आपने' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली तनुश्री, #MeToo मोहिमेमुळे 2018 मध्ये चर्चेचा विषय ठरली होती. सध्या तिच्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट करण्यात आलेला भावनिक आणि अस्वस्थ करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
22 जुलै रोजी रात्री तिने हा व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ती अत्यंत अशांत आणि भावनिक अवस्थेत दिसत आहे. या व्हिडीओत तनुश्रीने दावा केला आहे की, गेल्या काही वर्षांपासून तिला तिच्याच घरात मानसिक आणि इतर प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे. तिने या गोष्टीची तक्रार करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधल्याचंही नमूद केलं आहे.
तनुश्री म्हणते की, “2018 पासून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मी आता थकले आहे. माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. पोलिसांना मी कॉल केला असून त्यांनी मला तक्रार नोंदवण्यासाठी स्टेशनमध्ये बोलावलं आहे. सध्या माझी तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे मी लवकरच तक्रार दाखल करणार आहे.”
व्हिडीओमध्ये ती पुढे सांगते की, तिची तब्येत गेल्या काही वर्षांत खालावली असून, ती घरात एकटी राहत असल्यामुळे सर्व जबाबदाऱ्या स्वत: सांभाळते. मदतनीस ठेवण्याचा अनुभव तिला नकारात्मक असल्याने तिने कोणालाही कामावर ठेवलेलं नाही. तिला खऱ्या अर्थाने मदतीची आवश्यकता असल्याचं ती भावनिक स्वरात सांगते.
या पोस्टमध्ये तनुश्रीने कोणत्याही व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. मात्र, दुसऱ्या एका स्टोरीत तिने घराच्या बाहेर संशयास्पद आवाज येत असल्याचा उल्लेख केला आहे. तिचा अश्रूंनी भरलेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर तिला आधार देण्याचे आणि काळजी घेण्याचे संदेश पाठवले आहेत.
तनुश्री दत्ताच्या या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, ती लवकर सावरावी, अशी प्रार्थना अनेकांकडून केली जात आहे.
हेही वाचा