राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज, १२ डिसेंबर रोजी, ८५ वा वाढदिवस आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीसाठी अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलही उपस्थित होते. या भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिल्या.
अजित पवार म्हणाले की, आज साहेबांचा वाढदिवस आहे. उद्या काकींचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्या दोघांचे दर्शन घेण्याकरता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो. त्यांचं दर्शन घेतलं, चहा-पाणी झालं. सर्वसाधारण गोष्टींवर आमच्या चर्चा झाल्या. परभणीला काल असे का घडले? राज्यात इतर ठिकाणी काय सुरू आहे? अशा पद्धतीच्या आमच्या चर्चा झाल्या. आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? आमचं अधिवेशन कधी आहे? अशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितल.
अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राज्यासह देशभरातून त्यांच्या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडत अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांसोबत 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली होती. यानंतर शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंबीय आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र विधानसभेत अजित पवारांनी बाजी मारली.