उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी हिंजवडी परिसरातील नागरी सुविधा आणि विकासकामांची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली.
हिंजवडीसारख्या आयटी हबमध्ये मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्याने बंगळुरू व हैदराबादसारख्या शहरांकडे आयटी कंपन्या स्थलांतर करत आहेत, ही बाब अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली. "सकाळी सहा वाजता मी इथे येतो कारण मला तळमळ आहे, पण तुम्हाला काहीही पडलेलं नाही," असे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावत म्हटले.
पाहणीदरम्यान काही अधिकाऱ्यांनी धार्मिकस्थळे अडथळा ठरत असल्याची माहिती दिली असता, अजित पवार म्हणाले की, "धरणं बांधतानासुद्धा अनेक मंदिरे गेली होती. मला जे काही करायचं आहे ते मी करेन, तुम्ही मला काय सांगताय ते सांगा." याआधीच्या भेटीतही त्यांनी अनधिकृत अडथळ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. "353 कलमांतर्गत गुन्हे दाखल करा," असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले होते.
या पाहणी दौऱ्यात माध्यमांचे कॅमेरे सुरू असताना सुरू झालेली चर्चा पाहून अजित पवारांनी कॅमेरे बंद करण्यास सांगितले. "आपलं वाटोळं होत चाललंय, पुण्याचा आयटी पार्क रिकामा होतोय, आणि तुम्हाला काहीच वाटत नाही?", असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना सजग राहण्याचा इशारा दिला.
हिंजवडीतील विकासकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवारांनी स्पष्ट केले की "प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक कारवाई केली जाईल."
हेही वाचा