अमरावती|सूरज दाहाट : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा (Loudspeaker Row) उपस्थित केला होता. त्यामुळे अप्रत्यक्षपण मंदिरांच्या भोंग्यावर देखील प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी (Amravati) सर्वच धार्मिक स्थळांना परवानगी घेण्याचे आदेश दिले. परिणामी अनेक महत्त्वाच्या मंदिरात आरत्या, प्रार्थना भोंग्याविना पार पडत आहे. अशातच सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी आश्रम मधील महाद्वारावर असलेल्या भोंग्याची परंपरा इतिहासात पहिल्यांदा खंडित झाली. दररोज होणारी सामुदायिक प्रार्थना भोंगाविना पार पडत असल्याने या येथील भोंग्याला परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन मुस्लिम (Muslim) समाजाच्या वतीने तिवसा तहसीलदार वैभव फरताळे यांना देण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम मधील आश्रमात 80 वर्षापासून सकाळी भोंग्यावर ध्यान व प्रार्थना करण्याची परंपरा आहे. सकाळी सामुदायिक ध्यान व तुकडोजी महाराजांच्या आवाजातील भजने व अभंगाच्या माध्यमातून परिसरात प्रसन्नता निर्माण केली जाते, त्यामुळे पंचक्रोशी मध्ये नागरिकांची पहाट सामुदायिक ध्यानाने होते. मात्र मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे तुकडोजी महाराज यांच्या आश्रमातील भोंगा बंद झाला आहे. त्यामुळे सकाळचे सामुदायिक ध्यान भोंगा विना पार पडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अशातच तुकडोजी महाराजांचे आश्रमातील भोंगाला परवानगी द्यावी या मागणीचे निवेदन गुरुकुंज मोझरी येथील मुस्लीम बांधवांनी प्रशासनाकडे केली आहे.
शफिक शहा,अजहर शहा,समिर शेख,फिरोज शेख,शहारुख शेख,असिफ शहा इत्यादि मुस्लिम बांधवांनी ही मागणी केली आहे. मुस्लिम समाजातील युवकांनी केलेल्या या मागणीचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे, कारण मशिदी वरील भोंगे बंद झाल्याने अजाण भोंग्या विना होत आहे,तर दुसरीकडे आमच्या मशिदी वरील भोंगे बंद असले तरी चालेल पण सर्वधर्मसमभावाची शिकवन देणाऱ्या तुकडोजी महाराज यांच्या आश्रमातील भजने,प्रार्थना भोंग्यातुन झाली पाहिजे ही मागणी थेट मुस्लिम बांधवांनी केल्याने राज्यात जातीय विष कालविणाऱ्याला ही चपराक म्हणावी लागेल.