मुंबईत प्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले दाखल झाल्या होत्या. या भेटीदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राज्याच्या राजकीय घडामोडींबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासाठी एकत्र येणार का, या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला असताना, यावर आशा भोसले यांना विचारण्यात आलं. मात्र, त्यांनी या चर्चांबद्दल थेट प्रतिक्रिया न देता, "मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते, इतर कोणालाही ओळखत नाही," असं नमूद केलं.
त्यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारदेखील उपस्थित होते. त्यामुळे आशा भोसले यांनी त्यांचं नाव घेत थेट अन्य राजकीय नेत्यांविषयी भाष्य करणं टाळलं. तसंच, सध्या गाजत असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्यावर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि कोणत्याही राजकीय वादात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं.
विशेष म्हणजे, ठाकरे कुटुंबाशी आशा भोसले यांचे अनेक वर्षांचे जवळचे संबंध आहेत. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंच्या एका कार्यक्रमात त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. त्यांचं प्रामाणिकपणे कौतुकही केलं होतं. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचक वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
हेही वाचा